Saturday, January 12, 2013

त्याचं असं वागणं, तिचं असं न बोलणं...

तो ठरल्याप्रमाणे नेहमीच्या जागी आला...
पण त्याच्या लक्षात आले कि त्याला आजही उशीर झाला...
ती आधीच तिथे वाट बघत बसली होती..
तो उशिरा आला म्हणून त्याच्यावर रुसली होती...

"मला राग आलाय" म्हणून ती काहीच बोलली नाही..
पाठ करून बसून त्याच्याकडे जराही हलली नाही..
तोही मग मुद्दाम तसाच गप्प बसून राहिला...
पण तिला उगाच वाटलं कि तो तिच्यावर हसून राहिला..

ती हि गप्प, तो हि गप्प, तसाच वेळ निघत होता...
मावळतीचा सूर्य परत त्यांचा रोजचा खेळ बघत होता.
बराच वेळ झाला अजून कुणीच काहीच बोललं नाही,
त्यांना बघून झाडावरचं पाखरू सुद्धा हललं नाही.

सरतेशेवटी पळत्या त्या वाऱ्यालाच एक युक्ती सुचली,
सुंदर दोन गुलाबाची फुले त्याने त्याच्या कुशीत ओतली.
एक तिला देऊन दुसरं फुल त्याने तिच्या वेणीत माळलं.
आणि पुढलं नाजूक दृष्य ते निसर्गाला आधीच कळलं.

डोंगराच्या आड लपून सुर्यानेही मग त्यांना एकांत दिला.
वाऱ्यानेही जरा विसावा घेऊन परिसर तिथला शांत केला.
पाखरं निश्चिंत होऊन परत आपल्या घरट्याकडे फिरली.
आणि संधीचा लाभ घेऊन ती हळूच त्याच्या कुशीत शिरली.

                                                     --वैभव.

Monday, January 7, 2013

जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना....


मी जेव्हा या तुझ्या चेहऱ्याकडे बघतो ना...
दोन क्षण मला तसंच तिथे थांबावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जग मला तसंच तिथे थांबवावंस वाटतं.

मग सारं जग स्थिर, अन मी तुला बघायचं..
मग तुला हळूच माझ्या मिठीत घ्यावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जीवन तुझ्यावर लुटवून द्यावंस वाटतं.

तू मिठीत अन तुझी नजर माझ्या नजरेखाली,
अख्खं जीवन मला त्या क्षणात जगावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
तर सारं काही विसरून, तू तसंच बघावंस वाटतं.

मग मी हि तुला तसंच, एक सारखं बघायचं..
मग ते सारं काही जुनं, नव्याने घडावंस वाटतं.. 
अन जेव्हा, तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
परत मला एकदा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतं..

                                           ---वैभव.