Wednesday, November 20, 2013

एका प्रेमाची गोष्ट…

एक होता "तो" आणि एक होती "ती"                  घरासमोर घर आणि दारासमोर होती खिडकी
अन तिच्यावर त्याची जुळलेली प्रीती.                खिडकीत पहायचा तिची एक झलक उडती उडती.

तो तिला मात्र दररोज चोरुनच बघायचा              तिच्यासाठी त्याची वागणूक साहाजीक होती.
तिच्या लक्षात येताच विचित्र वागायचा               कारण तीचीहि अवस्था तशीच नाजूक होती.

रोज तो तिच्यासाठी बालकनीत यायचा              अन ती पण मुद्दाम रोज तिथंच यायची.
अन ती खिडकीत येताच दारामागे लपायचा.        केसं पुसता पुसता खेळ त्याचा पहायची.

दोघांच्याही मनात काहीतरी शिजत होतं              एकीकडे कळीतून हळूच फूल उमललं होतं
पण बोलायला मात्र कुणीच धजत नव्हतं             अन त्याचं नकळत तिच्यावर प्रेम जुळलंहोतं.

असंच चालायचं रोज, आणखी काहीच नाहीं          त्यांच्यासाठी तसं वागण्यातच एक गम्मत होती.
पण त्याचं हे वागण, चुकायचं कधीच नाही.          जी शब्दाहून जास्त भावनेनी जपतात काही नाती.

                                                                                                      --- वैभव. 

Friday, September 27, 2013

प्रेमाची लाट ती मनातली…

तीरावर तिची साथ, न संपणारी वाट
अन मनात उसळलेली ती प्रेमाची लाट.
लाटेने सरकलेली ती पायाखालची वाळू
तोल गेल्याने ती त्याला बिलगते हळू.

मग लगेच ती स्वतःला सावरू लागते
त्यातच त्याच्याकडे एकदा चोरून बघते.
गुपचूप तिचा हात तो हातात घेऊ बघतो
लगेच हात मागे घेते जीव तीचा घाबरतो.

परत निवांत दोघेही पुढे चालत राहतात
पायवाटा तेवढ्या एकमेकांशी बोलत राहतात.
परत एकदा मनातली ती लाट उसळते
पायाखालच्या त्यांच्या वाळूशी ती खेळते.

मग परत तिचा तोल त्याच्यावरच जातो
मात्र तो तिला सावरून स्वतः मागे होतो.
स्पर्शाने त्याच्या ती जराशी शहारून जाते
अन त्याच्या सहजतेने मन तिचे भरून येते.

आता मात्र तीच त्याचा हात घेते आपल्या हाती.
आणि हात त्याच्या हाती देते….… नेहमीसाठी.

                                            --वैभव.

Saturday, August 3, 2013

जशी ही मैत्री माझी नी तुझी...

जशी ही मैत्री माझी नी तुझी

मैत्री ही सतत खळखळत वाहणारी…
जशी झऱ्याच्या नितळ पाण्यासारखी
त्या खळखळणाऱ्या स्वरांना साद देत,
मनी गुणगुणलेल्या गाण्यासारखी.

मैत्री असते कधीही साथ न सोडणारी… 
रोज दर रोजच्या ठरलेल्या भेटीसारखी 
पायाखालून सरकुनही पायाखालीच राहणारी 
समुद्र किनाऱ्यावरच्या त्या रेतीसारखी. 

मैत्री ही असते नेहमी मार्ग दाखवणारी.
परतीला उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यासारखी. 
अंधारात वाट चुकून भटकलोच तरी, 
काळोखात चमकणाऱ्या काजव्यासारखी. 

मैत्री ही अशी सदैव जपून ठेवलेली 
शिंपल्यात सापडलेल्या मोतीसारखी 
जशी ही मैत्री माझी नी तुझी आणि 
तुझ्या माझ्या मैत्रीतल्या प्रीतीसारखी
                                     --वैभव.   

Wednesday, July 3, 2013

माझ्या कवितेतच तुला बघतो, असंच काही....

आजकाल बरेच जण मला विचारत असतात
काय रे तू बरेच दिवस झाले काही लिहिलं नाही?
कसं सांगू त्यांना कि मला काही सुचलं नाही 
कारण काही सुचायला तुला एवढ्यात पहिलं नाही.

मला जे काही सुचतं ते तुला बघूनच सुचतं 
न पाहीले तुला की काही चुकल्यासारखं वाटतं
म्हणायला तसा जगात असतो मी रोजच्या रोज 
पण श्वास घेऊनही काहीतरी मुकल्यासारखं वाटतं .

मग कल्पनेत ठेऊन तुला, मन मी माझे रितं करतो.
डोळे मिटून आठवणीत तुझ्या एकटाच स्मित करतो.
भावना येतात मनात साचून विचार तुझा करताच.
त्यांनाच मग जरासं जुळवून त्यांचे मी गीत करतो.

मी कविता का करतो हे माझं मलाच कळत नाही. 
पण तुझ्याशिवाय साधं यमक सुद्धा जुळत नाही. 
प्रत्यक्षात तर आता तुला कधी भेटू शकणार नाही. 
म्हणून माझ्या कवितेतच तुला बघतो, असंच काही. 

                                               --वैभव. 

Friday, March 22, 2013

तुझ्या माझ्या प्रीतीच्या साठवणी...

अस वाटतं आपण कधी वेळ काढून एकांतात बसावं
जुन्या आठवणीत विसरून जाऊन थोडं रडावं थोडं हसावं
उरल्या असेल काही गोष्टी मनात त्या बोलून घ्याव्यात
अर्धवट पुसलेल्या पायवाटा पुन्हा एकदा चालून बघाव्यात

नकळत झाल्या असतीलच चुका काही, एकदा सुधाराव्यात
नाजूक नात्यांच्या खचलेल्या भिंती पुन्हा एकदा उभाराव्यात
अर्ध्यावर मोडलेला भातुकलीचा खेळ परत मांडून बघावं
जगता आला तेच जीवन तर एकदा परत नव्याने जगावं

काही गोष्टी मनाजोग्या झाल्या असत्या तर बर झाल असतं
कारण आज तुला आठवून माझ मन अस चिंब झाल नसतं.
आता सारं संपलाय, शिल्लक आहेत त्या फक्त आठवणी.
तुझ्या माझ्या प्रीतीच्या जपून ठेवल्या आहेत मी साठवणी.

                                                            -- वैभव. 


Wednesday, February 20, 2013

हि बेभान सांज, हा बेधुंद वारा...


चंद्राची साक्ष आणि चांदण्यांचा पहारा
तुझ्या सौंदर्याचा हा मनमोहक नजारा
तुझ्या रूपाने उजळलाय असमंत सारा
साद देताहेत माझ्या मनाच्या तारा

जाईचा गंध, ओल्या मातीचा सुगंध
त्यावर तुझे ते गोड, स्मीत मंद मंद
हातात हात जसा नाजूक रेशीम बंध
तुझ्या प्रेमाचाच मला जणू जडलाय छंद

हि बेभान सांज, हा बेधुंद वारा
कोमल रिमझिम या पावसाच्या धारा
दव स्पर्शाने येणारा प्रेमळ शहारा
तुझ्या प्रेमात पडल्याचा देताहेत इशारा.

                                 -- वैभव.

Saturday, January 12, 2013

त्याचं असं वागणं, तिचं असं न बोलणं...

तो ठरल्याप्रमाणे नेहमीच्या जागी आला...
पण त्याच्या लक्षात आले कि त्याला आजही उशीर झाला...
ती आधीच तिथे वाट बघत बसली होती..
तो उशिरा आला म्हणून त्याच्यावर रुसली होती...

"मला राग आलाय" म्हणून ती काहीच बोलली नाही..
पाठ करून बसून त्याच्याकडे जराही हलली नाही..
तोही मग मुद्दाम तसाच गप्प बसून राहिला...
पण तिला उगाच वाटलं कि तो तिच्यावर हसून राहिला..

ती हि गप्प, तो हि गप्प, तसाच वेळ निघत होता...
मावळतीचा सूर्य परत त्यांचा रोजचा खेळ बघत होता.
बराच वेळ झाला अजून कुणीच काहीच बोललं नाही,
त्यांना बघून झाडावरचं पाखरू सुद्धा हललं नाही.

सरतेशेवटी पळत्या त्या वाऱ्यालाच एक युक्ती सुचली,
सुंदर दोन गुलाबाची फुले त्याने त्याच्या कुशीत ओतली.
एक तिला देऊन दुसरं फुल त्याने तिच्या वेणीत माळलं.
आणि पुढलं नाजूक दृष्य ते निसर्गाला आधीच कळलं.

डोंगराच्या आड लपून सुर्यानेही मग त्यांना एकांत दिला.
वाऱ्यानेही जरा विसावा घेऊन परिसर तिथला शांत केला.
पाखरं निश्चिंत होऊन परत आपल्या घरट्याकडे फिरली.
आणि संधीचा लाभ घेऊन ती हळूच त्याच्या कुशीत शिरली.

                                                     --वैभव.

Monday, January 7, 2013

जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना....


मी जेव्हा या तुझ्या चेहऱ्याकडे बघतो ना...
दोन क्षण मला तसंच तिथे थांबावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जग मला तसंच तिथे थांबवावंस वाटतं.

मग सारं जग स्थिर, अन मी तुला बघायचं..
मग तुला हळूच माझ्या मिठीत घ्यावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जीवन तुझ्यावर लुटवून द्यावंस वाटतं.

तू मिठीत अन तुझी नजर माझ्या नजरेखाली,
अख्खं जीवन मला त्या क्षणात जगावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
तर सारं काही विसरून, तू तसंच बघावंस वाटतं.

मग मी हि तुला तसंच, एक सारखं बघायचं..
मग ते सारं काही जुनं, नव्याने घडावंस वाटतं.. 
अन जेव्हा, तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
परत मला एकदा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतं..

                                           ---वैभव.