Thursday, October 18, 2012

माज्या शाळेतली शिरोडकर...


आम्ही पण गेलो होतो शाळेत तर..
अन आमचीही एक शिरोडकर होती,
मंजे, तुमच्या शाळेतली जशी होती न
एकदम तितकीच ती बी सुंदर होती.. 

जोश्याची शिरोडकर म्हणून आलीस
अन थेट माझ्या हृदयात शिरलीस तू..
"तू काय करतोस हितं?" म्हणत म्हणत,
स्वतःबरोबर कुटंतरी घेऊन गेलीस तू.

च्यायला नरू मामा खरंच सांगायचा कि ते..
कुणालाबी नाई भ्यायचं, अगदी बिंदास राहायचं..
आपल्याच लाईन ला सुद्धा नाई कळेल कंदी..
अश्या कलेनं आपल्या लाईन कडे पाहायचं...

जोश्यासारखं मी हि तसंच सांगत होतो
कि "आपण नाई तसल्या भानगडीत पडत"..
पर आता असर असाकाही झालाय तुजा
का मनातून विचाराचं पाखरु बी नाई उडत.

पर एकदाची जेवापासून शाळा सुटली आपली..
पाटी फुटली आन सारंच वेगळं घडून राहिलं...
पर या मनाचं पाखरू मात्र सैरभैर आजही,
तुज्याच विचारासोबत मुक्त उडून राहिलं...

                                         -वैभव.

Friday, October 5, 2012

आज परत पाऊस कोसळून गेला...

आज परत पाऊस काही आठवून गेला..
अजूनही नितांत प्रेमात आहे मी तुझ्या,
परत तेच ते एक मनाला पटवून गेला.

झाडांची पानं चिंब न चिंब भिजवून गेला..
भिजवलेल्या हिरव्या गार झाडांसोबत,
साऱ्याच जुन्या गोष्टी मनात सजवून गेला.

रुसून असलेल्या कळ्यांना हसवून गेला..
आणि कसाबसा जरा बाहेर मी येत होतो,
तर परत तुझा चेहरा मनावर ठसवून गेला.

पाऊस आला, कोसळला आणि निघून गेला..
मी बसून होतो तसाच.. तिथेच झोक्यावर एकटा,
मला आतल्या आत भिजत असताना बघून गेला.

                                                    --वैभव.

Monday, October 1, 2012

म्हणजे ती कधीच...

आज अचानक माझ्या मनात एक विचार आला...
काय होईल जरा उद्याचा दिवसच निघणार नाही..
म्हणजे सूर्य लपून राहील अन रात्रच संपणार नाही.. 

म्हणजे ती कधी सकाळी खिडकीत दिसणार नाही..
ओले चिंब केस लांब सडक कधीच पुसणार नाही..
अन खाली नजर करून गालात हसणार ही नाही..

म्हणजे ती बसच्या लाईनीत येऊन वाट बघणार नाही..
समोरच्या टपरीवर तिचे डोळे मला शोधणार नाही..
अन माझ्या साठी स्वतःच्या दोन बस सोडणार नाही..

कॉलेज सुटल्यावर मोडीवर नजरा मिळणार नाही..
मला बघण्यासाठी अधून मधून मागे वळणार नाही..
आणि... आणि...
माझ्या मनाच्या भावना तिला कधीच कळणार नाही..

खरंच, काय होईल उद्या जर सूर्यच उगवणार नाही..
दिवस म्हणू की रात्र, ते मला कधीच बघवणार नाही..
कारण,
अश्या या दिनचर्येशिवाय तिच्या मी जगू शकणार नाही..

                                                          -वैभव.