Saturday, September 29, 2012

हितगुज... तिचं नि त्याचं...

ती एकदा म्हणाली मला,
की तू नक्कीच कुणावर तरी फार प्रेम करतोस..
नाहीतर एवढ्या कविता कश्या काय करतोस...
       मी म्हणालो,
       अग त्यासाठी प्रेम करावंच लागतं असं नाही..
       तर जणू मनातल्या भावनांना फक्त शब्द देणं जसं काही..

ती म्हणाली,
नाही काही, मनाला पटणारं असं कुणी भेटलं ना मनाला..
की तरच मुळी आपल्या मनामध्ये त्या भावना जागतात..
       मी म्हणालो,
       तसंच नाही गं,, पण आतंच जास्त गर्दी झाली ना कधी..
       तर त्या आपोआप अश्या शब्दांद्वारे बाहेर येऊ बघतात...

ती म्हणाली,
ठीक आहे, समज पटलंय मला तू जे काही म्हणतोयस..
पण मग तुझ्या प्रत्येक कवितेत 'ति'चाच उल्लेख का असतो?
       मी म्हणालो,
       अगं, आता त्या भावना आहेत "या वेड्या मनाच्या"..
       त्यांच्यावर माझा असा नेहमीच पुरेपूर ताबा नसतो..

ती गोड हसली, म्हणाली,
हा हा हा, तुझ्याच मनावर तूझाच ताबा नाही..
म्हणजेच इथे नक्कीच शिजतंय काही तरी..
       मी म्हणालो,
       बरं बाबा, तुला जे समजायचं आहे ते समज..
       पण खरंच, अजून मला प्रेयसी नाही खरी खुरी..

मी मग मनात म्हणालो, 
इला आता सांगू तरी कसा, की तूच माझी प्रेरणा खरी..
दुसरी तिसरी कुणीही नसून तूच आहेस माझी स्वप्नपरी..
       ती मनात म्हणाली..
       काय सांगू, मलाही मनापासून वाटत एखादे वेळेस कधीतरी..
       की मलाही कधी भेटावं असं, तुझ्यासारखच कुणी तरी..

                                                              -वैभव.

Monday, September 24, 2012

एकच होते हृदय मला...

कधीतरी एकदा असे काही घडले...                      
की मन हे माझे तुझ्यात जडले..
अन मी नकळत तुझ्या प्रेमात पडले..
प्रेमा पायी तुझ्या मी घरदार सोडले.. 
जीवन भर जपलेल्या नात्यांना तोडले..
साऱ्यांचे विश्वास काही क्षणात मोडले..

हृदयाच्या अश्रुंवर खोटे अंथरूण ओढले..
होते नव्हते मनात ते सर्व संशय काढले..
अन तू दिलेल्या वचनांच्या दारी चढले..

तू मात्र क्षणभरात सारेच काही मोडले...
असा वागलास जणू काही नाही घडले..
अन कुणा दुसरी साठी तू मला सोडले..

मग एक दिवस तू अचानक परत आलास.
म्हणालास "जुनं सारे काही विसरून जा..
परत एकदा माझ्या प्रेमात पडून पहा.."

मी तर परत तयार होऊन जाईल ही रे..
पण परत मन जडणार नाही त्याच काय..
कारण परत प्रेम करायला हृदय कुठाय..

एक संधी देण्यासाठी तू हातही जोडलेस..
पण एक गोष्ट तू पुरताच विसरून गेला..
एकच होते हृदय मला.. ते तूच तर तोडलेस..

                                            -वैभव.

Monday, September 17, 2012

मलाही एकदा खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय तुझ्या...


वर वर सांगत असतो मी सर्वांना नेहमी की,
मी नाही आहे प्रेमाच्या वैगेरे फंदात ते बरंय..
पण खरं सांगू का गं तुला, असं वाटतं कधी की,
मलाही एकदा ना खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय.

जे सारं काही कवितांमध्ये लिहित आलोय ना 
ते सारं नेहमी प्रत्यक्षात तुजसाठी करायचंय.
स्वप्नाबाहेर एकदा खऱ्या प्रेमात पडून तुझ्या
त्या सुंदर कल्पनेचा मला अनुभव घ्यायचाय.

स्वप्नात तर रोजच पडतो मी तुझ्या प्रेमात,
एकदा बाहेरही ये ना गं खरीखुरी कधीतरी..
तुझ्यावरच लिहिलेल्या त्या कविता वाचून
तुझ्याबद्दल विचारतात माझे मित्र कितीतरी.

कधी कधी ना देवावरही मला राग येतो थोडा,
सगळीकडे प्रेमाचा फार आरडा ओरडा असतो..
जणू देवाने वर्षावच लावलाय प्रेमाचा इथे तर..
पण या वर्षावात मीच एक फक्त कोरडा असतो..

साक्ष आहे खऱ्या प्रेमाची, खरंच सांगतो मी,
रोज सकाळी देवाजवळ तुलाच मागतो मी..
स्वप्नात येतेस तर असं नाही की झोपलोय
तर तुझ्याच विचारात दिवसरात्र जागतो मी..

                                               - वैभव.

Saturday, September 8, 2012

पण जेव्हा तू अशी...


तू जेव्हा अशी नजरे आड असतेस ना...
जीवन ना, फार सुनं सुनं वाटतं,
ताजं एखादं फूल सुद्धा जुनं जुनं वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ बसतेस ना...
          सारं जग कसं अगदी नकोसं वाटतं,
          अन त्या क्षणाने तिथंच थांबावसं वाटतं. 


तू जेव्हा कधी अशी रुसून बसतेस ना...
माझंच मन मला खायला धावतं,
अन वेड्या वाकड्या कसरती करायला लावतं.

          पण मग जेव्हा तू छान लाजून हसतेस ना...
          त्या कसरतींच पण मनाला वेड लागतं,
          अन मन तुला तसंच हसताना बघायला लावतं.


तू जेव्हा कधी अशी जवळ नसतेस ना...
आयुष्य कुठेतरी अपूर्ण वाटतं,
जणू मनावर कसलंतरी मोठं ऋण वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना...
          ते ऋणही मला फार हिनं वाटतं,
          अन माझं अर्धवट आयुष्य ते पूर्ण वाटतं.


                                                    -वैभव.

Thursday, September 6, 2012

असं कधीच वाटलं नव्हतं...

 कधी तरी असं पण घडेल
असं कधीच वाटलं नव्हतं.
मन कधी कुणासाठी एवढे झुरेल
असं कुणीच मनाला पटलं नव्हतं.

अशीही कधी अवस्था होईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
डोळे बरेचदा पाणावले होते पण
हृदयात कधी पाणी साठलं नव्हतं.

कधी एकदा असाही प्रसंग येईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
लाखोंच्या विरोधातही हात घट्ट पकडून ठेवणार
असं कुणीच आजवर भेटलं नव्हतं.

मी ही प्रेमात पडेल कधी कुणाच्या
असं कधीच वाटलं नव्हतं.
कारण इतक्या प्रेमाने स्वतःच्या कुशीत
कधीच, कुणीच गाठलं नव्हतं.

कारण "प्रेम करतो" असे बरेच म्हणाले होते
पण कधीच, काहीच वाटलं नव्हतं.
पण थेट मनाची साद येईल इतक्या आपुलकीने
कधीच, कुणीच म्हटलं नव्हतं.

--वैभव

Monday, September 3, 2012

त्याने काही फरक पडत नाही..

तू हो म्हण किंवा नाही म्हण, त्याने काही फरक पडत नाही..
माझ्या मनाच्या तारा नेहमीच तुझ्या मनाशी जुळत राहील.

          बऱ्याच आठवणी दिल्या आहेस जपून ठेवण्यासाठी तू मला
          त्या आठवणींची पाने अजूनही हे मन तसंच चाळत राहील.

तू सोबत ये किंवा नको येऊ, त्याने काही फरक पडत नाही..
हे मन मात्र तुझ्या आठवणीच्या पायवाटेनुसार वळत राहील.

          असं वेड लागलाय तुझं मला की नसशील तू या जगात जरी
          तरी माझं हृदय नेहमीच तुझ्या हृदयामागे तसंच पळत राहील.

तू दखल घे की नको घेउस, त्याने काही फरक पडत नाही.
मी मात्र असाच या हसऱ्या चेहऱ्यामागे अश्रू गाळत राहील.

          परतण्याचे वचन दे नको देऊ, त्याने काही फरक पडत नाही.
          मी मात्र तुझ्या प्रतीक्षेत नेहमीच दिव्यासारखा जळत राहील.


-- वैभव.