Tuesday, February 11, 2020

मी अन माझं मन

एक कटू सत्य आहे, जगात एकटेच आलोय अन एकटेच जाणार 

मध्येच कुणी आलं तर येईल कदाचित, आठवण देऊन जाणार 

आठवण… आठवण अशी की जी जन्मभराला साठवण होऊन जाणार 

साठवण … कदाचित प्रेमाच्या आठवणींची साठवण. 

प्रेम… प्रेम काय असतं मला माहीत नाही. प्रेम मी कधी केलंच नाही 

कारण मैत्रीपलीकडे, प्रेमापर्यंत आमचं प्रकरण कधी गेलंच नाही 

अर्थात, तसं फक्त आम्हीच म्हणतो, आम्ही म्हणजे, मी अन माझं मन 

"ती?" "ती" कोण ? ती आली, थांबली अन गेली, होतो फक्त आम्ही दोघे जण 

                                                                         मी अन माझं मन 

प्रेम हा एक जुगार आहे, 

जो जिंकला त्याला आणखीनच अमीर केलं. अन जो हरला,

त्यानं जो दाव लावला होता ते ही त्याच्या हातून गेलं 

प्रेम… प्रेम काय असतं मला माहीत नाही प्रेम मी कधी केलंच नाही 


मैत्रीपलीकडे, प्रेमापर्यंत आमचं प्रकरण कधी गेलंच नाही 

अर्थात, तसं फक्त आम्हीच म्हणतो, आम्ही म्हणजे मी अन माझं मन 

                                                                               -- वैभव 

Monday, March 21, 2016

मी तुझ्या अन तू माझ्या, रोजच प्रेमात पडत राहावं

असं वाटतं हे सारं काही असंच घडत राहावं 
प्रीतीचं हे पाखरू हवेत असंच उडत राहावं 

मैत्रिणींच्या घोळक्यातून लवकर तू सुटावं 
बागेत ठरल्या ठिकाणी गुपचूप येउन भेटावं 
उशीरा तू आलीस म्हणून आज मी रुसावं 
लाडात येउन मग तू मला रेटूनच बसावं. 

रोजच तू मला एक नवी कविता मागावी 
ज्यासाठी मी कालची अख्खी रात्र जागावी 
दहा ओळींची कविता तू उत्सुकतेने वाचावी 
तेव्हाच मला आणखी एक चारोळी सुचावी 

बागेतला गुलाब आत्ताच हवा, तू हट्ट करावा 
काटा रुतेल या भीतीने हात माझा घट्ट धरावा 
केसात तुझ्या माळताना तू अशी काही लाजावी 
जणू स्वप्नातली ती राणी आज प्रत्यक्ष सजावी  

खरच, असं वाटतं हे सारं काही असंच घडत राहावं 
मी तुझ्या अन तू माझ्या, रोजच प्रेमात पडत राहावं

                                                     --वैभव 

Sunday, February 22, 2015

म्हणूनच तीच्याशी वाद घालतो...

आजही ती रुसली, म्हणाली "आज परत तू उशिरा आला"
"जराही तुला धीर नाही का?" म्हणत मीच वाद  सुरु केला 

वाद झाला तिच्याशी जरा की मनवायचं तीला राहून जातं 
रुसलेलं तिचं ते रूप बघताना मन हे माझं वाहून जातं

गोऱ्या पिवळ्या चेहऱ्यावरती फुगलेल्या गालांचा लाल रंग 
गुलाबाच्या फुलाभोवती जणू कोमल पारीजातकाचा संग 

रागावलीस कि गोड दिसतेस सांगाव तीला खूप असं वाटतं 
पण चेहऱ्यावरचं रागीट रूप ते निघून जायला नकोसं वाटतं  

बिनबुडाचे सगळे आरोप तीचे तरी उगीच त्यांना साद घालतो 
फक्त रुसलेलं तीला बघावं म्हणूनच तीच्याशी वाद घालतो 

                                                                  -- वैभव 

Friday, November 21, 2014

कदाचित माझंही आता तुझ्यावर प्रेम जणू जडतंय...

का कुणास ठाऊक आजकाल का असं होतंय
राहून राहून मन माझ ध्यास तुझा घेतंय 

इतक्यात मी फारंच अशी वेड्यासारखी वागतेय 
कविता तुझ्या वाचत वाचत रात्रभर जागतेय 

सांजवेळी अलगद जाऊन बसते मी झोक्यावर 
कोकिळेसंगे गाणी गाते पाळण्याच्या ठोक्यावर 

उमललेल्या फुलावर मग फुलपाखरू येउन बसतं  
अन ते पाहून मन माझ आतल्या आत हसतं 

जरा वेळाने फुलपाखरू ते कुठच्या कुठं उडून जातं 
हास्य मात्र या ओठांवरती तसंच ते सोडून जातं 

का कुणास ठाऊक आजकाल काही विचित्र घडतंय 
कदाचित माझंही आता तुझ्यावर प्रेम जणू जडतंय 

                                            -- वैभव. 

Saturday, August 23, 2014

काल ती प्रत्यक्ष स्वप्नातून बाहेरच आली …

काल माहितेय जरा एक गम्मतच झाली. 
ती ना प्रत्यक्ष स्वप्नातून बाहेरच आली 
"किती हा पसारा" म्हणत जवळ येउन बसली 
जवळ तिला बघताच माझी झोपच उडाली 

तेच ते वागणं, अगदी तसच तिचं हसणं 
भास झाल्यागत माझ्या जवळ येउन बसणं 
बोलताना कसल पण भान तिला नसणं 
कविता केली नाही म्हणून राग येउन रुसणं 

कशीतरी मग तिची समजूत मी काढली 
चारोळी तिच्याच रुपाची पुढे तिच्या वाढली 
मग तशीच गोड खळी गाली तिच्या पडली 
लाजून तिनं ओढणी मग तोंडावर ओढली. 

तेच तिचं नटणं आणि तसच तिचं सजणं 
स्वप्नी जशी लाजते अगदी तसच तिचं लाजणं 
सांगायचं काही मला पण आतल्याआत न धजणं
मग जवळ माझ्या येउन मंजुळ ते कुजबुजणं

काल ती प्रत्यक्ष स्वप्नातून आली खरीखुरी 
जाताना मात्र कानमंत्र ठेऊन गेली माघारी 
"रोज राजा करत राहा तू कविता एक प्यारी 


आहे मीच तुझ्या कवितांची खरी अधिकारी"

                                             --  वैभव. 

Friday, February 21, 2014

स्वप्नात पण तुझ्यावर प्रेम माझं जडतं...

स्वप्नात पण तुझ्यावर प्रेम माझं जडतं.

आजकाल रोज अलबत असं काही घडतं
पहाटे जाग येण्यापूर्वी स्वप्न तुझं पडतं

स्वप्नात मला तू अशी काही छळतेस
की दूर बसून नजरेशी लपंडाव खेळतेस

नजरेच्या खेळात मात्र माझीच हार होते
जेव्हा तुझी नजर माझ्या काळजापार होते

आरपार नजर होऊन हे काळीज ठार होते
अन अशी ही अवस्था माझी वारंवार होते

आता हे वरचेवर नेहमीच असं घडतं की
पहाटे जाग येण्यापूर्वी स्वप्न तुझं पडतं

तिकडेही रोज अलबत असंच काही घडतं
स्वप्नात पण तुझ्यावर प्रेम माझं जडतं.

                                                          -- वैभव 

Wednesday, November 20, 2013

एका प्रेमाची गोष्ट…

एक होता "तो" आणि एक होती "ती"                  घरासमोर घर आणि दारासमोर होती खिडकी
अन तिच्यावर त्याची जुळलेली प्रीती.                खिडकीत पहायचा तिची एक झलक उडती उडती.

तो तिला मात्र दररोज चोरुनच बघायचा              तिच्यासाठी त्याची वागणूक साहाजीक होती.
तिच्या लक्षात येताच विचित्र वागायचा               कारण तीचीहि अवस्था तशीच नाजूक होती.

रोज तो तिच्यासाठी बालकनीत यायचा              अन ती पण मुद्दाम रोज तिथंच यायची.
अन ती खिडकीत येताच दारामागे लपायचा.        केसं पुसता पुसता खेळ त्याचा पहायची.

दोघांच्याही मनात काहीतरी शिजत होतं              एकीकडे कळीतून हळूच फूल उमललं होतं
पण बोलायला मात्र कुणीच धजत नव्हतं             अन त्याचं नकळत तिच्यावर प्रेम जुळलंहोतं.

असंच चालायचं रोज, आणखी काहीच नाहीं          त्यांच्यासाठी तसं वागण्यातच एक गम्मत होती.
पण त्याचं हे वागण, चुकायचं कधीच नाही.          जी शब्दाहून जास्त भावनेनी जपतात काही नाती.

                                                                                                      --- वैभव. 

Friday, September 27, 2013

प्रेमाची लाट ती मनातली…

तीरावर तिची साथ, न संपणारी वाट
अन मनात उसळलेली ती प्रेमाची लाट.
लाटेने सरकलेली ती पायाखालची वाळू
तोल गेल्याने ती त्याला बिलगते हळू.

मग लगेच ती स्वतःला सावरू लागते
त्यातच त्याच्याकडे एकदा चोरून बघते.
गुपचूप तिचा हात तो हातात घेऊ बघतो
लगेच हात मागे घेते जीव तीचा घाबरतो.

परत निवांत दोघेही पुढे चालत राहतात
पायवाटा तेवढ्या एकमेकांशी बोलत राहतात.
परत एकदा मनातली ती लाट उसळते
पायाखालच्या त्यांच्या वाळूशी ती खेळते.

मग परत तिचा तोल त्याच्यावरच जातो
मात्र तो तिला सावरून स्वतः मागे होतो.
स्पर्शाने त्याच्या ती जराशी शहारून जाते
अन त्याच्या सहजतेने मन तिचे भरून येते.

आता मात्र तीच त्याचा हात घेते आपल्या हाती.
आणि हात त्याच्या हाती देते….… नेहमीसाठी.

                                            --वैभव.

Saturday, August 3, 2013

जशी ही मैत्री माझी नी तुझी...

जशी ही मैत्री माझी नी तुझी

मैत्री ही सतत खळखळत वाहणारी…
जशी झऱ्याच्या नितळ पाण्यासारखी
त्या खळखळणाऱ्या स्वरांना साद देत,
मनी गुणगुणलेल्या गाण्यासारखी.

मैत्री असते कधीही साथ न सोडणारी… 
रोज दर रोजच्या ठरलेल्या भेटीसारखी 
पायाखालून सरकुनही पायाखालीच राहणारी 
समुद्र किनाऱ्यावरच्या त्या रेतीसारखी. 

मैत्री ही असते नेहमी मार्ग दाखवणारी.
परतीला उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यासारखी. 
अंधारात वाट चुकून भटकलोच तरी, 
काळोखात चमकणाऱ्या काजव्यासारखी. 

मैत्री ही अशी सदैव जपून ठेवलेली 
शिंपल्यात सापडलेल्या मोतीसारखी 
जशी ही मैत्री माझी नी तुझी आणि 
तुझ्या माझ्या मैत्रीतल्या प्रीतीसारखी
                                     --वैभव.   

Wednesday, July 3, 2013

माझ्या कवितेतच तुला बघतो, असंच काही....

आजकाल बरेच जण मला विचारत असतात
काय रे तू बरेच दिवस झाले काही लिहिलं नाही?
कसं सांगू त्यांना कि मला काही सुचलं नाही 
कारण काही सुचायला तुला एवढ्यात पहिलं नाही.

मला जे काही सुचतं ते तुला बघूनच सुचतं 
न पाहीले तुला की काही चुकल्यासारखं वाटतं
म्हणायला तसा जगात असतो मी रोजच्या रोज 
पण श्वास घेऊनही काहीतरी मुकल्यासारखं वाटतं .

मग कल्पनेत ठेऊन तुला, मन मी माझे रितं करतो.
डोळे मिटून आठवणीत तुझ्या एकटाच स्मित करतो.
भावना येतात मनात साचून विचार तुझा करताच.
त्यांनाच मग जरासं जुळवून त्यांचे मी गीत करतो.

मी कविता का करतो हे माझं मलाच कळत नाही. 
पण तुझ्याशिवाय साधं यमक सुद्धा जुळत नाही. 
प्रत्यक्षात तर आता तुला कधी भेटू शकणार नाही. 
म्हणून माझ्या कवितेतच तुला बघतो, असंच काही. 

                                               --वैभव.